spot_img
spot_img
spot_img

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने ११.१३ कोटींची फसवणूक; ७ जणांना अटक, १.८० कोटी रुपये होल्ड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शेअर मार्केट व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ७ आरोपींना सायबर पोलिसांनी महाराष्ट्र व राजस्थानातून अटक केली असून या प्रकरणात १ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम होल्ड करण्यात आली आहे.

सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा क्रमांक ०५/२०२६ नुसार फिर्यादी यांना शेअर मार्केट व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे सांगून आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी वारंवार पैसे मागवले. फिर्यादींकडून एकूण ११,१३,००,००० रुपये घेतले, मात्र कोणताही परतावा दिला नाही. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३३८, ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६(सी), ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपींनी अॅक्सिस बँकेच्या खात्यात २१ लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. हे खाते कोल्हापूर येथील ‘गंगासाई टेक्सटाईल’ नावाने असल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी कोल्हापूर येथे जाऊन तपास केला असता अभय बाबासाहेब पाटील याने हे खाते शिवतेज राजेंद्र पोटे याला वापरण्यास दिल्याचे उघड झाले. त्यानंतर पाटीलला अटक करण्यात आली.

यानंतर वाघोली येथील शिवतेज पोटे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सायबर गुन्ह्यासाठी १५ ते २० बँक खाती वापरल्याची कबुली दिली. तसेच युवराज ऊर्फ संतोष मुदलीयार (पुणे), पंकज उर्फ रॉनी गिरीगोस्वामी (राजस्थान) आणि प्रल्हाद गाडरी (राजस्थान) यांच्यासह गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या तिघांनाही अटक केली.

तसेच कोटक बँकेच्या खात्यात २५ लाख रुपये जमा झाल्याचे तपासात आढळले. हे खाते महेश करबसपा उडचणे (दहिसर, मुंबई) याच्या नावावर असल्याचे समोर आले. त्याने हे खाते राहुल बहादुरप्रसाद मौर्य याला कमिशन घेऊन दिल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी महेश उडचणे व राहुल मौर्य यांनाही अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे –
१) अभय बाबासाहेब पाटील (कोल्हापूर)
२) शिवतेज राजेंद्र पोटे (वाघोली, पुणे)
३) महेश करबसपा उडचणे (दहिसर, मुंबई)
४) राहुल बहादुरप्रसाद मौर्य (दहिसर, मुंबई)
५) युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार (लोहगाव, पुणे)
६) पंकज मंगु गिरीगोस्वामी (राजस्थान)
७) प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (राजस्थान)

या कारवाईत पोलिसांनी १ कोटी ८० लाख रुपये होल्ड केले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व सायबर पोलीस पथकाने केली.

न्यायालयीन कामकाजावेळी सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी बाजू मांडून आरोपींची पोलीस कोठडी मिळविण्यास मदत केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!