शबनम न्यूज | प्रतिनिधी
तक्रार दिल्याच्या रागातून घरासमोर येऊन एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना पिंपरीतील शास्त्रीनगर परिसरात घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर, डीलक्स टॉकीजमागे, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी राजबहादुर रामदास यादव (वय ४५, व्यवसाय – व्यापार, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे आपल्या घरात जेवण करत असताना दरवाजा वाजवल्यामुळे ते बाहेर आले. त्यावेळी आरोपी स्वप्निल चंदनशिवे याने “आमच्याविरुद्ध का तक्रार दिली?” असे म्हणत फिर्यादीला हाताने थप्पड मारली. त्यानंतर आरोपी ललीतेश पिंगळे व अनिश पिंगळे यांनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या कपाळावर व नाकावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी स्वप्निल चंदनशिवे याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तोत्रे करीत आहेत.


