पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयातर्फे नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी “पोलीस आयुक्तांची भेट” हा विशेष उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भेट घेऊन आपल्या तक्रारी, सूचना व अपेक्षा मांडता येणार आहेत.
हा उपक्रम दर सोमवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील पोलीस आयुक्त कार्यालयात होणार असून यावेळी पोलीस आयुक्त, सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपायुक्त उपस्थित राहणार आहेत. नागरिक-केंद्रीत पोलीसिंग, तक्रार निवारणाला गती आणि प्रशासनाबद्दल विश्वास वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे Pimpri Chinchwad Police Commissionerate तर्फे सांगण्यात आले आहे.
शहरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच औद्योगिक प्रतिनिधींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


