शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड शहरात एमएनजीएल (MNGL) गॅस कनेक्शन बंद करण्याची बनावट नोटीस पाठवून एका नागरिकाची १५ लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील उद्यमनगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादीच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून एक संदेश आला.
या संदेशात “MNGL Gas user – तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट नसल्याने आज रात्री ९ वाजता गॅस कनेक्शन तोडण्यात येईल” असे नमूद होते. तसेच बिल अपडेटसाठी राकेश पटेल नावाच्या व्यक्तीला संपर्क करण्यास सांगण्यात आले होते.
फिर्यादीने संशय न येता संबंधित क्रमांकावर कॉल केला. आरोपीने स्वतःला एमएनजीएलचा अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीकडून डेबिट व क्रेडिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर “ट्रान्झॅक्शन फेल झाले आहे” असे सांगून पुन्हा-पुन्हा प्रक्रिया केल्याचे भासवण्यात आले.
या कालावधीत फिर्यादीच्या बँक खात्यातून एकूण १५ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तात्काळ संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर तांत्रिक तपास सुरू केला आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस, वीज, बँक किंवा सरकारी खात्यांबाबत येणाऱ्या अशा प्रकारच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणालाही ओटीपी, डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये.
संशयास्पद कॉल किंवा संदेश आल्यास त्वरित पोलिसांशी किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा.




Total Users : 228618