शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड शहरात तडीपार आदेशाचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी कोयता बाळगणाऱ्या एका आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील सुमारस शेवाळे सेंटरसमोरील रोडवर पोलिस शिपाई समीर लक्ष्मण ढवळे हे गस्त घालत असताना संशयास्पदरीत्या फिरणारा इसम आढळून आला. तपासणी दरम्यान त्याच्याकडून २०० रुपयांचा एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कुणाल ऊर्फ बिच्या विजय कदम (वय २७, रा. बोपखेलनगर, पिंपरी) असे असून तो मजुरीचे काम करतो. तपासात आरोपी हा तडीपार असल्याचे निष्पन्न झाले.
त्याला यापूर्वीच पिंपरी–चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.
मात्र, संबंधित अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता तो पिंपरी परिसरात आढळून आला.
आरोपीकडे कोणालातरी दुखापत करण्याच्या उद्देशाने कोयता बाळगण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


