शबनम न्यूज | प्रतिनिधी
शस्त्र दाखवून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास काते वस्ती, पुनावळे येथील ढाबा मॅट कॅन्टीन परिसरात घडली.
आरोपी नितीन गुलाबराव पाटील (वय ४२, रा. अकलूज, जि. सोलापूर) याने आर्थिक वादातून महिला साक्षीदार अनिता साळुंखे व त्यांचे पती नुतन पाटील यांच्याशी वाद घातला. यावेळी आरोपीने गावठी पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मोठ्या आवाजात शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. रावेत पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्या झडतीत विनापरवाना गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले.
या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.




Total Users : 228634