पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक अखेर संपन्न झाली असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. निकालानुसार भाजपने तब्बल ८४ नगरसेवक निवडून आणत महानगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजपविरुद्ध जोरदार लढत देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत अनेक दिग्गज नगरसेवक-नगरसेविकांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर काही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेखनीय ठरला तो प्रभाग क्रमांक २३ मधील भाजपच्या मनीषाताई प्रमोद पवार यांच्या दणदणीत विजयाचा.
मनीषाताई प्रमोद पवार या सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी २०१७ मध्ये प्रथमच निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यानंतर भाजपच्या कार्यकाळात पूर्ण पाच वर्षे त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले. याच काळात त्यांना शालेय शिक्षण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने करत शिक्षणासह नागरी सुविधा, मूलभूत प्रश्न आणि विकासकामांवर विशेष लक्ष केंद्रित केले.
महापालिकेच्या प्रशासकीय काळातही तब्बल चार वर्षे त्यांनी प्रभागात आपला सक्रिय संपर्क कायम ठेवत विकासकामांचा पाठपुरावा केला. प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदतीला धावून जाण्याची त्यांची भूमिका मतदारांच्या विशेष पसंतीस उतरली. मतदारांशी असलेले घनिष्ठ नाते आणि कामातील सातत्य याचाच परिणाम म्हणून यंदाच्या निवडणुकीत त्यांना मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला.
या निवडणुकीत मनीषाताई प्रमोद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मालिका नितीन साखळे यांचा पराभव केला. मनीषाताई पवार यांना ७,७६६ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ६,५३१ मते मिळाली.
विशेष बाब म्हणजे, मनीषाताई प्रमोद पवार यांच्या ‘अ’ गटातून एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर त्यांच्या विरोधात सात उमेदवार उभे होते. इतक्या मोठ्या स्पर्धेतही सर्व उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळवत त्यांनी आपला विजय ठामपणे नोंदविला, ज्यामुळे त्यांचे प्रभागातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, काम, विश्वास आणि सातत्य यांना मिळालेली पावती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


