spot_img
spot_img
spot_img
spot_img

बारणे कॉर्नर ते वृंदावन स्वीट होम रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तातडीच्या कारवाईची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील बारणे कॉर्नर ते वृंदावन स्वीट होम (१६ नंबर बसस्टॉप) या रस्त्याची अत्यंत खराब झालेली अवस्था लक्षात घेऊन तातडीने डांबरीकरण, अवजड वाहनांना बंदी आणि ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्याची मागणी वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य अजिंक्य दिलीप बारणे यांनी महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उंच-सखल पृष्ठभाग आणि खराब झालेले डांबरीकरण यामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

याशिवाय या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असून रस्त्याचे अधिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बारणे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर बारणे कॉर्नर ते वृंदावन स्वीट होम हा संपूर्ण रस्ता तातडीने नव्याने डांबरीकरण (Resurfacing) करावा, अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालावेत, तसेच संपूर्ण रस्ता ‘नो पार्किंग झोन’ घोषित करून बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा अजिंक्य बारणे यांनी व्यक्त केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!