spot_img
spot_img
spot_img

ह.भ.प. किसन महाराज चौधरी, जयंत उर्फ आप्पा बागल आणि शिल्पा धर्माधिकारी ‘संत सेवक’ पुरस्काराने सन्मानित

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बोलावा विठ्ठल’ या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला विठ्ठलभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग. दि. माडगूळकर सभागृहात पार पडलेल्या या भक्तिमय सोहळ्यात विठ्ठल नामाच्या गजरात अभंग, भक्तिगीते आणि अध्यात्माचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. याचवेळी समाजसेवा, अध्यात्म, शिक्षण आणि संस्कार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘संत सेवक पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ह.भ.प. किसन महाराज पांडुरंग चौधरी, ह.भ.प. जयंत उर्फ आप्पा नेमाडे बागल आणि ह.भ.प. सौ. शिल्पा दीपक धर्माधिकारी यांना ‘संत सेवक पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या समाजप्रबोधन, वारकरी परंपरेचा प्रचार-प्रसार आणि मानवसेवेतील योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कारार्थींचा सन्मान केला. कार्यक्रमाला वारकरी संप्रदायातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक आणि विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार कुमार करंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेले अभंग सादर करण्यात आले. त्यांच्यासोबत श्रुती करंदीकर, सौरभ दफ्तरदार, वैदेही करंबेळकर, इंद्रायणी महाजन, अंकिता पांडेराणे आणि ओंकार पाटणकर यांनी आपल्या सादरीकरणातून संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊ घातले.

भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले, “आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून संतांच्या विचारातून समाजाला सेवा, समता आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि वारकरी परंपरेतील संस्कार अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने ‘संत सेवक पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. भविष्यातही अशा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे सातत्य राखले जाईल.”

माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे म्हणाल्या, “संत परंपरा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. भक्तीबरोबरच समाजसेवा, संस्कार आणि माणुसकीची मूल्ये जपणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे ही समाजाची जबाबदारी आहे. ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमातून भक्तीचा संदेश तर दिलाच, पण समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांचे कार्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.”

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!