पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
मावळ तालुक्यातील मंगरुळ येथील नवलाख उंब्रते रोडवर भरधाव ट्रेलर पलटी होऊन चालक जखमी झाल्याची घटना २२ जुलै रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रेलरचे मोठे नुकसान झाले असून मागील बाजूस ठेवलेल्या दोन लोखंडी कॉईल रस्त्यावर कोसळल्याने आर्थिक नुकसान झाले.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक नितीन सुभाषराव गवळी (वय ४२, रा. दापोडी, पुणे) हा ट्रेलर (क्र. GJ-06-AZ-2048) भरधाव व निष्काळजीपणे चालवत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर पलटी झाला. अपघातात ट्रेलरची केबिन चक्काचूर झाली, समोरील काच फुटली तसेच वाहनातील दोन लोखंडी कॉईल खाली पडून त्यांचेही नुकसान झाले.
या अपघातात चालकाच्या डाव्या मनगटाला, कपाळाला आणि उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार दांगट पुढील तपास करत आहेत.


