spot_img
spot_img
spot_img

स्व. आशा भोसालेंवरील विशेषांकाचे उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रकाशन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कोट्यावधी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकीळा पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांच्यावरील ‘स्वरप्रतिभा’ मासिकाचा ‘देशो देशी पानो-पानी आशा आशा ‘ या विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते सोमवार दि. २७ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे संपन्न होणार आहे. या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार अध्यक्षस्थान भूषवणार असून, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ आणि पुणे म.न.पा. कॉंग्रेस पक्ष गटनेते अॅड. रामचंद्र उर्फ. चंदूशेठ कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ज्येष्ठ निवेदिका नीरजा आपटे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या प्रेरणेतून व सहयोगातून या विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती संयोजक स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी दिली.

या कार्यक्रमात प्रारंभी सौ. तन्मयी मेहेंदळे – कुलकर्णी शिव-स्तवन सादर करणार असून तबला साथ- जयराज हुंडेकरी आणि संवादिनी संगत- सुदिन जोशी करणार आहेत.

प्रकाशनानंतर आशाताईंच्या गाजलेल्या अवीट मराठी व हिंदी गाण्यांच्या ‘स्वरस्वामिनी आशा’ हा मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम प्रख्यात गायिका मनीषा निश्चल व जितेंद्र पेटकर सादर करणार असून याचं निवेदन रवींद्र खरे करणार आहेत. त्यांना अमन सय्यद-किबोर्ड, चिंतन मोढा-किबोर्ड, हर्षद गणबोटे-तबला, आसिफ खान-ऑक्टोपॅड, मोहनिश निश्चल-गिटार आणि आशिष राखे (साऊंड) हे साथ देतील.

हा संपूर्ण कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. याच्या मोफत प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर येथे तिकीट विक्री खिडकीवर दि. २३ जुलै पासून उपलब्ध असतील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. ‘स्वरप्रतिभा’ स्व. आशा भोसले विशेषांक यावेळी सवलतीत उपलब्ध असेल.

स्व. आशाताईंवरील विविध वृत्तपत्रांतील अग्रलेख, त्यांच्या निधनानंतर देशभर विविधभाषिक वृत्तपत्रांच्या पहिल्या पृष्ठावर प्रकाशित झालेल्या तसेच जगातील प्रमुख ५० देशांमधील प्रमुख दैनिकांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या व लेख, स्व. आशाताईंचे विविध नामवेतांसमवेतचे असंख्य फोटो आणि आशाताईंनी गायलेल्या निवडक हिंदी व मराठी लोकप्रिय गाण्यांची गीतकार, संगीतकार, चित्रपट व वर्ष यांची अल्फाबेटीकल सूची यांचा या २२५ पृष्ठांच्या विशेषांकात समावेश आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!