spot_img
spot_img
spot_img

चिंचवडगावातील वारंवार वीज खंडितीवर नागरिक संतप्त; महावितरणला निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चिंचवडगाव, केशवनगर, तानाजीनगर व परिसरात वारंवार होणाऱ्या विद्युत पुरवठा खंडितीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या वीज खंडितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, या समस्येबाबत महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी महावितरणचे अभियंता मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी मधुकर बच्चे यांनी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा केली. अनेकदा किरकोळ तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा बंद होतो. मात्र, योग्य नियोजनाचा अभाव असल्याने चार, पाच, सहा तर काही वेळा तब्बल आठ-आठ तास नागरिकांना अंधारात राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक असलेली केबल टेस्टिंग गाडी वेळेत उपलब्ध होत नाही, तसेच देखभाल करणाऱ्या खाजगी एजन्सी घटनास्थळी उशिरा पोहोचतात, अशी कारणे वारंवार पुढे केली जातात. मात्र, या सर्व बाबींचे प्रभावी नियोजन करणे ही महावितरण प्रशासनाची जबाबदारी असल्याचे बच्चे यांनी स्पष्ट केले.

महावितरणची अनेक कामे खासगी एजन्सीमार्फत केली जात असताना त्या एजन्सी मनमानी करत असतील तर संबंधित वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नियोजनातील त्रुटींमुळे सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

परिसरातील नागरिकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या रोषाला महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच सामोरे जावे लागेल, असा इशाराही मधुकर बच्चे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!