पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुपीनगर येथे वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना बुधवारी (दि. ८) दुपारी घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसीफ अल्लाउद्दीन राईन (वय २२, रा. साईनाथनगर, निगडी) हे आपल्या भावासह तळवडे रोडवरील राज ऑटो गॅरेजमध्ये गेले होते. तेथे आरोपी मिथुन याला वडिलांना शिवीगाळ का केली, असा जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी तौसीफ यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, इम्रान याने कोयत्याने तौसीफ यांच्या डोक्यावर व डोळ्याखाली वार करून गंभीर दुखापत केली.
या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


