नैसर्गिक जलप्रवाहांचे संवर्धन करण्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नैसर्गिक जलप्रवाह, नाले-ओढे आणि पाणी मुरण्याच्या व्यवस्थेचे संवर्धन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात भोईर यांनी म्हटले आहे की, अल्पकालीन पाऊस झाला तरी शहरातील प्रमुख रस्ते, चौक, महामार्ग तसेच निवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, नागरिकांची गैरसोय आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. ही समस्या केवळ मुसळधार पावसामुळे नव्हे, तर नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमणे आणि अनियोजित शहरीकरणामुळे निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पूर्वी रस्त्यांच्या कडेला असलेले मातीचे चर, नैसर्गिक नाले, ओढे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविणाऱ्या खुल्या जागा मोठ्या प्रमाणावर नष्ट झाल्या आहेत. वाढते काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉकचा अतिवापर, अनियंत्रित बांधकामे आणि नैसर्गिक जलमार्गांवरील अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता थेट रस्त्यांवर साचत असल्याने जलनिस्सारण यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भोईर यांनी महानगरपालिकेकडे शहरातील सर्व नैसर्गिक नाले, ओढे, तलाव आणि पावसाच्या पाण्याच्या प्रवाहांचे वैज्ञानिक सर्वेक्षण व मॅपिंग करून त्यांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन विकासकामे, रस्ते आणि गृहप्रकल्पांना मंजुरी देताना नैसर्गिक जलप्रवाह अबाधित राहतील, याची सक्तीने अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय रेन वॉटर रिचार्ज झोन, जैविक जलनिस्सारण व्यवस्था (बायो-स्वेल्स), खुल्या मातीच्या जागा आणि पर्यावरणपूरक जलव्यवस्थापन उपायांना प्राधान्य देण्याचीही त्यांनी सूचना केली आहे.
शहराचा विकास हा केवळ रस्ते आणि उड्डाणपूल उभारण्यात नसून पर्यावरणीय संतुलन, जलव्यवस्थापन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनातही असल्याचे सांगत, भविष्यातील शहरी पूर, भूजल पातळीतील घट आणि पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने व्यापक व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.


