सुमारे २५० नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी, ब्लँकेट, बिस्किटे व जीवनावश्यक साहित्याचे वाटप
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पवना नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. या आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत उन्नती सोशल फाउंडेशनने तातडीने मदतीचा हात पुढे करत पूरग्रस्त नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी, नाश्ता, ब्लँकेट, बिस्किटे तसेच अन्य आवश्यक साहित्याचे वाटप केले.
रहाटणी परिसरातील सुमारे २०० नागरिकांना महानगरपालिका प्राथमिक शाळा, रहाटणी (मुले व मुली शाळा क्र. ५५) येथे, तर पिंपळे सौदागर परिसरातील सुमारे ५० नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्राथमिक शाळा क्र. ५१ (आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय परिसर) येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सकाळचा नाश्ता, पिण्याचे स्वच्छ पाणी, ब्लँकेट, बिस्किटे तसेच आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका तथा उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे, संस्थापक संजय तात्याबा भिसे यांनी स्वतः शाळांमध्ये भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस केली. नागरिकांना धीर देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्यालाही सहकार्य केले. फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी मदतकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
उन्नती सोशल फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्याची परंपरा संस्थेने कायम राखली आहे. पूरग्रस्त नागरिकांना केवळ साहित्याची मदत नव्हे, तर मानसिक आधार व सुरक्षिततेची भावना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात मागील संकल्पना विशद करताना फाउंडेशनचे अध्यक्षा तथा नगरसेविका डॉ.सौ.कुंदा ताई संजय भिसे म्हणाल्या , “नैसर्गिक आपत्ती कोणालाही सांगून येत नाही. अशा वेळी समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या मदतीला धावून जाणे, हीच खरी माणुसकी आहे. उन्नती सोशल फाउंडेशन नेहमीच संकटग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे आणि पुढेही राहील. पूरग्रस्त नागरिकांना तातडीने अन्न, पिण्याचे पाणी, ब्लँकेट व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यामागील आमचा उद्देश त्यांना संकटाच्या काळात आधार देण्याचा होता. समाजातील प्रत्येकाने शक्य त्या स्वरूपात मदतीचा हात पुढे केल्यास कोणतेही संकट आपण एकजुटीने पार करू शकतो. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहनही मी सर्वांना करते.”


