पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब
ताथवडे परिसरात अनैतिक संबंधांच्या संशयातून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले. पत्नीसोबत संबंध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणावर पॉकेट चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अशोकनगर, ताथवडे येथील रोहन बिल्डर परिसरात ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी सूरज बैचा सरदार (वय २७) यांच्यात फिर्यादीच्या पत्नीशी असलेल्या कथित संबंधांवरून वाद झाला. यावेळी आरोपीने फिर्यादीला “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत पॉकेट चाकूने डाव्या हातावर तसेच बरगडीजवळ वार केले.
या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर वाकड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सूरज सरदार याला अटक केली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक झिंजारके करीत आहेत.



