शबनम न्यूज | प्रतिनिधी
युनायटेड किंगडम (लंडन) येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या ‘ग्लोबल वारी’चे शनिवारी मावळ तालुक्यात आगमन होताच वारकरी संप्रदायाने उत्स्फूर्त आणि भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत केले. तब्बल ११ देशांतून प्रवास करत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या वैश्विक दिंडीचे स्वागत ह.भ.प. संतोष महाराज शेलार (संस्थापक, मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ) यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी आमदार सुनील आण्णा शेळके संस्थापक श्री विठ्ठल परिवार, मावळ यांच्या वतीनेही वारकऱ्यांचे दर्शन व स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी यूके (लंडन) दिंडीचे प्रमुख ह.भ.प. अनिल महाराज खेडेकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास ह.भ.प. गणेश महाराज जांभळे, बाळाभाऊ आडकर, लक्ष्मण भाऊ सातकर, दत्ता महाराज केदारी, नितीन महाराज काकडे, बाळासाहेब महाराज जांभुळकर यांच्यासह श्री विठ्ठल परिवार, मावळचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीतील वारकऱ्यांसाठी हॉटेल इंद्रायणीचे शेलार बंधूंनी नाश्त्याची व्यवस्था केली होती. घोरवडेश्वर दिंडी, मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आणि श्री विठ्ठल परिवार, मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ह.भ.प. बाळासाहेब काशीद पाटील, मुकुंद नाना राऊत, शंकरनाना शेलार, विजय आण्णा पवार, तुकाराम गाडे, पं स समिती सदस्य दिलीप ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
लंडनपासून पंढरपूरपर्यंतचा हा अध्यात्म, भक्ती आणि भारतीय संस्कृतीचा संदेश जगभर पोहोचविणारा प्रवास असल्याने मावळकरांनीही दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत विठ्ठलनामाच्या जयघोषात भाविकांना शुभेच्छा दिल्या.



