पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
मोशीतील एका औद्योगिक कंपनीत काम करताना मशीनमधून उडालेला लोखंडी तुकडा मानेवर आदळल्याने १२वी उत्तीर्ण तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कंपनी मालक, सुपरवायझर आणि कामगार ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता. त्याला प्रेस शॉपमधील मशीन चालविण्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसतानाही संबंधितांनी त्याच्याकडून ऑपरेटरचे काम करून घेतल्याचा आरोप आहे.
१ जुलै रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मोशी येथील ए/१ स्टॅम्पिंग कंपनीत काम सुरू असताना मशीनमधील लोखंडी जॉब उडून तरुणाच्या मानेवर आदळला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून संदेश प्रभुराव पांडे (व्यवसायिक), सुपरवायझर बाळाजी पंढरीनाथ अलुरे आणि कामगार ठेकेदार दीपक शिवाजी राळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) व ३(५) अन्वये एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



