पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
दिघी पोलिसांनी खंडणी प्रकरणात मोठी कारवाई करत सिक्युरिटी एजन्सीचा व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीला ३ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशना ऊर्फ महेश सखाराम शिरोळे (वय २८, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) याने एका खासगी सिक्युरिटी एजन्सीच्या व्यवस्थापनाला वारंवार धमक्या देत व्यवसाय चालवायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा दबाव टाकला होता.
आरोपीने कंपनीच्या सुपरवायझरला व्हॉट्सअॅप कॉल करून सुरुवातीला १० लाख, त्यानंतर ८ लाख, ७ लाख आणि अखेरीस ६ लाख रुपयांची मागणी केली. “चाकणमध्ये माझी मोठी दहशत आहे, पैसे दिले नाहीत तर खल्लास करून टाकतो,” अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी श्रीकांत शामराव बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ३ लाख रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.



