spot_img
spot_img
spot_img
spot_img

स्वतःच्या शेतातील माती-मुरूम वापरल्यास रॉयल्टी नाही; पोलीस वा महसूल कारवाईही होणार नाही

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी (२ जुलै २०२६) शेतकऱ्यांच्या हिताचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी सभागृहात उपस्थित केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे निवेदन मांडल्यानंतर आमदार शेळके यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी आमदार शेळके यांनी मंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारत, शेतकरी स्वतःच्या शेतजमिनीत शेतीसाठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने किंवा स्वतःच्या वापरासाठी त्याच शेतातील माती अथवा मुरूम काढत असल्यास त्यावर रॉयल्टी आकारली जाणार का, तसेच अशा शेतकऱ्यांवर महसूल किंवा पोलीस प्रशासनाकडून कारवाई होणार का, अशी विचारणा केली.

यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी स्वतःच्या शेतजमिनीत उत्खनन करून त्याच ठिकाणची माती किंवा मुरूम स्वतःच्या शेतीच्या कामासाठी वापरत असल्यास कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. तसेच अशा प्रकरणांमध्ये महसूल किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही.

या निर्णयाचे स्वागत करत आमदार सुनील शेळके यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे शेततळी, बांधबंदिस्ती, शेत सपाटीकरण तसेच इतर शेती सुधारणा कामे करताना शेतकऱ्यांवरील अनावश्यक आर्थिक भार आणि कारवाईची भीती दूर होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गातून या निर्णयाचे तसेच सभागृहात शेतकऱ्यांचा मुद्दा प्रभावीपणे मांडल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांच्या भूमिकेचेही स्वागत करण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!