spot_img
spot_img
spot_img

शालेय परिसरातील धोकादायक झाडे व मोडकळीस आलेल्या संरचनांचे तातडीने सर्वेक्षण करा

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबईतील चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांच्या परिसरातील धोकादायक झाडे, मोडकळीस आलेल्या संरचना व इतर संभाव्य धोकादायक संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सध्या शहरात पावसाळा सुरू असून मुसळधार पावसामुळे मोठी झाडे उन्मळून पडणे, जुने वीज खांब कोसळणे, जीर्ण इमारतींचे भाग ढासळणे तसेच इतर दुर्घटनांचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे भोईर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शहरातील शाळांच्या परिसरातील जुनी व धोकादायक झाडे, मोडकळीस आलेले वीज खांब, मोठे होर्डिंग्ज, केबल लाईन्स, उघडी अथवा खराब चेंबरची झाकणे, जीर्ण इमारती, जुने वाडे आणि इतर धोकादायक संरचनांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती दुरुस्ती अथवा हटविण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह संबंधित सर्व विभागांना तातडीच्या सूचना देऊन शाळा परिसर व सार्वजनिक ठिकाणी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश द्यावेत, अशीही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवून शहरातील शाळा परिसर सुरक्षित करण्यावर भर द्यावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!