पुणे, ता. १ – एआय चॅटबॉट वापरणारा साक्षर आणि न वापरणारा निरक्षर, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणे अवघड आहे. मात्र व्यावसायिक आणि व्यापार करणार असाल आणि तुम्ही बदललेले तंत्रज्ञान वापरणार नसाल तर तुम्ही मागे पडू शकता. एआयमुळे अनेक प्रकारच्या निर्मिती करणे सोपे झाले आहे, असे मत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दिपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.
जाहिरात, विपणन आणि माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या रिजनल अॅडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन (रामा) च्या वतीने बुधवारी (ता.१) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत डॉ. शिकारपूर यांनी मार्गदर्शन केले. रामाचे अध्यक्ष दिनकर शिलेदार, रिव्हेल अॅडव्हर्टायझिंग क्षेत्रातील उद्योजक महेश घोरपडे आणि यावेळी उपस्थित होते.
सभेदरम्यान रामा संस्थेचे संस्थापक संचालक ईश्वर दिवे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले असून, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
डॉ. शिकारपूर म्हणाले, वैयक्तिक माहिती कमी प्रमाणात समाज माध्यमांवर टाकावी. आपला फोन आपण बोलत आहोत हे सर्व ऐकत असतो व त्यानुसार आपल्याला विविध पर्याय उपलब्ध करून देतो. सर्वसामान्यांकडून जमा झालेला डेटा काही कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहेत. सध्या जनरेटीव्ह एआय देखील विकसित आहे. त्याद्वारे अनेक कामे सोपी झाली आहेत. एआय हा पॅटर्न सांगू शकतो. त्यातून तो अनेक माहिती क्षणात देऊ शकतो. २०३०- ३२ नंतर पारंपारिक शिक्षण बंद होण्याची शक्यता आहे. ज्ञानप्राप्तीसाठी एआय चॅट बाँक्स प्रभावी ठरत आहे. त्यामुळे काही वर्षांनंतर शिक्षणासाठी पारंपारिक शिक्षण आवश्यक राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. एआय, चॅटबॉट, जेमिनी यासह अनेक व्यासपीठ कसे वापरायचे याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शिलेदार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, जाहीरात क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. वृत्तपत्रांना पुन्हा चांगले दिवस येतील असे दिवस आले आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार एजन्सींमध्ये बदल घडणे आवश्यक झाले आहे.
डॉ. शिकारपूर यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
– एआयला काही मर्यादा असून तो कधी-कधी खोटी माहिती देतो
– एआय आणि मानव निर्मित डेटा यातील फरक समजला पाहिजे
– पाल्यांनी मुलांना काय चांगले व वाईट सांगणे आवश्यक आहे
– एआयचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे
– समाज माध्यमांचा वापर करून सायबर गुन्हेगार आपले सावज हेरतात


