शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला विकास प्रकल्पांतर्गत कबड्डी संघातील खेळाडूंना क्रीडा किट्सचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवार (३० जून २०२६) रोजी महापालिकेच्या माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथील कबड्डी हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागाचे सभापती कैलास कुटे यांच्या हस्ते खेळाडूंना किट्सचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसदस्य तथा क्रीडा समिती सदस्य तानाजी बारणे, प्रशासन अधिकारी दत्ता सूर्यवंशी, क्रीडा अधिकारी दीपक कन्हेरे, माध्यमिक विद्यालय थेरगावचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड तसेच आकांक्षा फाउंडेशनचे व्यवस्थापक आकाश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या खेळाडू दत्तक योजनेतील कबड्डीपटू तसेच माध्यमिक विद्यालय थेरगावच्या कबड्डी संघातील मुलींनी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून महानगरपालिकेचा नावलौकिक उंचावल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सभापती कैलास कुटे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करताना, “राज्य व राष्ट्रीय स्तरावरील यशानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून पिंपरी-चिंचवडचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन क्रीडा किट्स मिळाल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या साहित्यामुळे आगामी स्पर्धांसाठी अधिक जोमाने तयारी करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या संघाला महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत आहे. तसेच क्रीडा पर्यवेक्षक व राष्ट्रीय खेळाडू बन्सी आटवे आणि एन.आय.एस. कबड्डी मार्गदर्शिका सोनाली जाधव यांचे मोलाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन खेळाडूंना लाभत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सातत्याने यशस्वी कामगिरी करत आहे.


