spot_img
spot_img
spot_img

‘प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर हो… आम्ही गुन्हेगार’ – खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचा एल्गार

चिंचवड, २६ जून : पत्रकारांना मारण्याची भाषा करणाऱ्या व आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात मराठी पत्रकार संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केवळ माफी मागून चालणार नाही, पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा शिवसेना पक्षाच्या व नेत्यांच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा थेट इशारा यावेळी देण्यात आला.

 

शुक्रवारी सायंकाळी के. एस. बी. चौक, चिंचवड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर हा निषेध नोंदवण्यात आला. प्रथम शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रस्त्यालगत तीव्र निदर्शने करण्यात आली.

“सत्तेचा माज उतरवू” : पत्रकार संघाचा इशारा

“पत्रकारांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. सत्तेचा माज आलेल्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देऊ,” अशी आक्रमक भूमिका मराठी पत्रकार संघाने घेतली. खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला.

यावेळी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, पुणे जिल्हा अध्यक्ष संजय मराठे तसेच विकास साळवे व संगीता पाचंगे यांनी मनोगत व्यक्त करताना खासदारांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. “लोकशाहीचा चौथा स्तंभ दाबण्याचा प्रयत्न म्हणजे थेट लोकशाहीवर हल्ला आहे. पत्रकार प्रश्न विचारणे थांबवणार नाहीत. पक्षाने कारवाई केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

“प्रश्न विचारणं गुन्हा असेल, तर हो… आम्ही पत्रकार गुन्हेगार आहोत!” या बॅनरखाली झालेल्या या आंदोलनात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी विवेक कुलकर्णी, बजरंग मासाळ, संतोष महामुनी, रोहित खर्गे, नागेश खजुर्गीकर, पराग डिंगणकर, उमेश सणस, तौफीक सय्यद, गजाला सय्यद, आसीया इनामदार, उमेश पाटील, जगदीश बच्छाव यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते.

पक्षाकडून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभर शिवसेनेच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा पत्रकार संघाने दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!