पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
ऑनलाइन प्रॉडक्ट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास प्रत्येक व्यवहारावर किमान 20 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची 23 लाख 88 हजार 810 रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, vinceofficial.online या वेबसाइटच्या माध्यमातून तसेच @Hitesh_Lalwan, @cloudkissed1 आणि @Mrs_Parmila या टेलिग्राम आयडीवरून आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सअॅप चॅटद्वारे ऑनलाइन ट्रेडिंगची माहिती देत मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 23.88 लाख रुपये जमा करून घेतले. मात्र, कोणताही परतावा न देता संपूर्ण रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
हा प्रकार 25 मे ते 15 जून 2026 या कालावधीत घडला असून, 24 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हितेश ललवानी, प्रमिला सचदेव व संयुक्ता हे अद्याप फरार असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.


