शबनम न्यूज | प्रतिनिधी
आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जविरोधात मोठी कारवाई करत आतापर्यंत ७० होर्डिंग्ज हटवली आहेत. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न व्हावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या निर्देशानुसार हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गांवरील १२३ होर्डिंग्जचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये विनापरवाना व नियमबाह्य उभारण्यात आलेली ७० होर्डिंग्ज निष्कासित करण्यात आली.
यामध्ये हवेली-सोलापूर मार्गावरील ३२, दौंडमधील १३, पुरंदरमधील १३ आणि वडकी परिसरातील १२ होर्डिंग्जचा समावेश आहे. काही होर्डिंगधारकांनी स्वतःहूनही होर्डिंग्ज काढून घेतल्याची माहिती पीएमआरडीएने दिली.
अनधिकृत बांधकाम विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांनी सांगितले की, पीएमआरडीएच्या हद्दीतील इतर प्रमुख मार्गांवरही सर्वेक्षण सुरू असून विनापरवाना आढळणाऱ्या होर्डिंग्जवर कठोर कारवाई केली जाणार आहे.


