पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात जुन्या वादातून एका चालकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्ला थांबविण्यासाठी आलेल्या पत्नी आणि मुलालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी सोपान रुपनर (वय ५२) हे २३ जून रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास श्रीराम कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे असताना आरोपी सुनिल मारुती लोणी व त्याच्या तीन साथीदारांनी जुन्या वादाच्या कारणावरून त्यांना गाठले. आरोपींनी प्रथम लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर सुनिल लोणी याने सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने रुपनर यांच्या डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
आरडाओरडा ऐकून रुपनर यांची पत्नी आणि मुलगा मदतीसाठी धावून आले असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी रुपनर यांच्या घरावर दगडफेक करून परिसरात दहशत निर्माण केली.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करंबळकर करीत आहेत.


