पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
आळंदी परिसरात बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करताना एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी एका प्रौढ व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंद्रायणीनगर येथील चैतन्य आश्रमाच्या कोपऱ्यावर देशी दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा विक्रम सोळंकी याच्या सांगण्यावरून देशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून १ हजार ६८० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली.
प्राथमिक तपासात अल्पवयीन मुलाचा वापर करून दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विक्रम सोळंकी याचा शोध सुरू आहे.
अल्पवयीन मुलांचा वापर करून बेकायदेशीर व्यवसाय चालविण्याच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोईर करीत आहेत.


