शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सहशहर अभियंता देवण्णा गट्टुवार हे सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही महापालिकेच्या स्थायी समितीच्या कामकाजात कथित हस्तक्षेप करत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. कोणतेही अधिकृत पद अथवा जबाबदारी नसताना त्यांचा स्थायी समिती कार्यालयातील वाढता वावर चर्चेचा विषय ठरत आहे.
महापालिकेतील विविध विभागांमध्ये चार दशकांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या गट्टुवार हे स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांचे अनौपचारिक सल्लागार म्हणून कार्यरत असल्याची चर्चा आहे. अधिकृत नियुक्ती नसतानाही ते वारंवार स्थायी समिती कार्यालयात उपस्थित राहत असल्याचे सांगितले जात आहे.
काही कर्मचाऱ्यांच्या मते, गट्टुवार दिवसभर स्थायी समिती कार्यालयात उपस्थित राहून विविध प्रशासकीय आणि आर्थिक विषयांवर चर्चा करतात. तसेच, मार्गदर्शनाच्या नावाखाली काही निर्णय प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोपही केले जात आहेत.
महापालिकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेचे अधिकार संबंधित अधिकारी, प्रशासक आणि लोकप्रतिनिधींना असताना, कोणत्याही अधिकृत पदावर नसलेल्या व्यक्तीची उपस्थिती आणि सहभाग याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवृत्त अधिकाऱ्यांनी अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करणे वेगळी बाब असली तरी निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
निवृत्तीनंतर लाखो रुपयांची पेन्शन आणि इतर लाभ मिळत असतानाही गट्टुवार यांचा महापालिकेतील वाढता वावर अनेकांच्या भुवया उंचावत आहे. यामुळे कर्मचारी आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी महापालिका प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. गट्टुवार यांना कोणत्याही स्वरूपाची अधिकृत जबाबदारी देण्यात आली आहे का, ते कोणत्या अधिकाराने स्थायी समितीच्या कामकाजात सहभागी होत आहेत, तसेच त्यांचा वावर प्रशासनाच्या परवानगीने आहे की वैयक्तिक स्तरावर, याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असली, तरी निवृत्तीनंतरही महापालिकेतील त्यांच्या सक्रिय उपस्थितीची चर्चा सध्या जोर धरत आहे.


