शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जलसाचणे, ड्रेनेज तुंबणे आणि अस्वच्छतेच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. या समस्यांची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी फ क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून निवेदनाद्वारे मागणी केली होती.मारुती जाधव यांच्या पाठपुराव्याला यश मिळत असून प्रशासनाने प्रभागातील स्ट्रॉम वॉटर लाईन, नाले आणि ड्रेनेज लाईनची साफसफाई व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.
भीमशक्ती नगर, कृष्णानगर, महात्मा फुले नगर, घरकुल, कोयना नगर, शरद नगर तसेच परिसरातील विविध भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
या कामांमुळे पावसाचे पाणी साचणे, रस्त्यांवर सांडपाणी येणे तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः घरकुल व भीमशक्ती नगर परिसरातील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबत मारुती जाधव यांनी सांगितले की, “नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन कामांना सुरुवात केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा.”प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन, फ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि संबंधित विभागांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. नागरिकांच्या हितासाठी अशीच सकारात्मक आणि तत्पर कार्यवाही पुढेही सुरू राहील, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे.


