पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी युनूस खतीब
दिघी परिसरात कौटुंबिक वादातून एका तरुणावर मेव्हणे आणि मेव्हणीकडून लाकडी बांबू व दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूम सोडून गेल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून आरोपींनी फिर्यादी प्रकाश राठोड यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी एका आरोपीने लाकडी बांबूने पाठीवर व मानेवर वार केले, तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाईकालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने फिर्यादीला खाली पाडून रस्त्यावरील दगड डोक्यात मारल्याने ते जखमी झाले.
हल्ल्यानंतर आरोपींनी “तुला पुण्यात राहू देणार नाही” अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी दिघी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


