पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
खेड तालुक्यातील म्हाळुंगे परिसरात भरधाव आयशर टेम्पोच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास म्हाळुंगे गावातील कमानीजवळ अशोक परसु गौंड (वय 25) हे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी तळेगावकडून चाकणच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच 20 ईएल 2619) ने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात अशोक गौंड गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी मृताच्या पत्नी रश्मी अशोक गौंड (वय 22) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक दिपक रामभाऊ राठोड याच्याविरुद्ध उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


