पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
रावेत पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला अटक करून दोन चैन स्नॅचिंग आणि एक मोटारसायकल चोरीसह एकूण सहा गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. आरोपीकडून सुमारे 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 198/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(4), 3(5) अन्वये दाखल करण्यात आला होता. 2 जून 2026 रोजी सायंकाळी फिर्यादी कविता मिलिंद केसरकर या पतीसोबत रावेत परिसरात फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावून पळ काढला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले.
तपासादरम्यान आदित्य परशुराम मनलोर (वय 19, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने साथीदार फिदा मनुआली इराणी (वय 35) याच्या मदतीने रावेत परिसरात चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून रावेत पोलीस ठाण्यातील दोन चैन स्नॅचिंग प्रकरणांतील सुमारे 1 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. तसेच कर्नाटक राज्यातील बिदर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असलेली KA-38-EA-8929 क्रमांकाची चोरीची मोटारसायकल (किंमत 1 लाख रुपये) हस्तगत केली.
या तपासातून खालील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे:
– रावेत पोलीस ठाणे गु.र.नं. 198/2026 – चैन स्नॅचिंग
– रावेत पोलीस ठाणे गु.र.नं. 06/2025 – चैन स्नॅचिंग
– हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. 311/2026
– तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं. 195/2026
– विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 286/2026
– बिदर ग्रामीण (कर्नाटक) गु.र.नं. 15/2026 – मोटारसायकल चोरी
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक आरोपीवर यापूर्वी मोबाईल स्नॅचिंग व चैन स्नॅचिंगचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे, संतोष कोळगे, आशिष बोटके, गोविंद चव्हाण, विनायक मराठे, प्रदीप गायकवाड, अजित बेंडभर, सौदागर लामतुरे, विनोद कदम आणि निखिल कपले यांच्या पथकाने केली.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


