शबनम न्यूज | प्रतिनिधी
“आशा भोसले या अत्यंत जिद्दी आणि कामसू होत्या. आयुष्यातील प्रत्येक संकटाला त्यांनी धैर्याने तोंड दिले. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे एक युद्धच होते. लता दीदींच्या गायनाने मन समृद्ध होत असे, तर आशाताईंच्या गीतांनी पाय आपोआप थिरकू लागत. त्यांच्या अचानक जाण्याने मंगेशकर कुटुंबावर मोठा आघात झाला,” अशा भावनिक शब्दांत ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रवीण प्र. वाळिंबे यांनी संपादित केलेल्या पद्मविभूषण आशा भोसले यांच्या जीवन आणि कारकिर्दीवर आधारित ‘देशो देशी पानो पाणी आशा आशा’ या स्वरप्रतिभा विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात उषा मंगेशकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, पुणे मनपा काँग्रेसचे गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम आणि नगरसेवक सुनील शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी उषा मंगेशकर यांनी लता आणि आशा भोसले यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कोलकात्यातील एका मैफिलीस तब्बल १ लाख ३० हजार रसिकांनी तिकीट काढून उपस्थिती लावल्याचा उल्लेख त्यांनी केला. “पुढील २०० वर्षांत लता आणि आशा यांच्यासारख्या गायिका होणे कठीण आहे. लता दीदींनी ३५ भाषांमध्ये गाणी गायली, तर आशाताईंनीही आपल्या बहुआयामी गायकीने वेगळे स्थान निर्माण केले,” असे त्या म्हणाल्या.
“आशाताई आजही त्यांच्या गीतांमधून अजरामर आहेत. म्हणूनच आम्ही त्यांच्या छायाचित्राला कधी हार घालत नाही. चार मुलांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी स्वतःचे दुःख कधी मुलांपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यांना साड्यांची आणि खरेदीची विशेष आवड होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला. मंगेशकर घराण्यातील गायनाची परंपरा अखंड सुरू राहावी, यासाठी मी आजही गात आहे,” असेही त्यांनी सांगितले.
आशाताईंनी हजारो गाणी गायली, त्यातील ‘पांडूरंग कांती दिव्य तेज झळकती’ हे आशाताईंनी गायलेले गाणे मला खूप आवडते असे त्या म्हणाल्या.
माजी आमदार उल्हास पवार यांनी या विशेषांकाचे कौतुक करताना सांगितले की, आशा भोसले यांच्यावरील विविध भाषांतील लेख, छायाचित्रे आणि निधनानंतर जगभरातील वृत्तपत्रांतील ठळक बातम्यांचे संकलन करणे हे अत्यंत अवघड काम होते. हा विशेषांक संग्रही ठेवावा असा दस्तावेज ठरेल.
ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ म्हणाले, “आशाताईंचे गायन म्हणजे ऊर्जा देणारा अनुभव होता. त्यांच्या अनेक मुलाखती घेण्याची संधी मिळाली. आता उषाताईंची मुलाखत घेण्याची इच्छा आहे.” त्यांच्या या इच्छेला उषा मंगेशकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यावर ‘स्वरप्रतिभा’तर्फे दिवाळीपूर्वी उषाताईच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करू असे प्रविण प्र. वाळिंबे यांनी जाहीर केले.
ॲड. चंदूशेठ कदम यांनी विशेषांकातील लेखांचे संकलन माहितीपूर्ण असल्याचे सांगत मंगेशकर कुटुंबाच्या संगीत योगदानाचा गौरव केला. मंगेशकर कुटुंबीय मूळ सांगलीचे असून मी देखील सांगलीचा असल्याचे सांगत मंगेशकरांशी आपले भावनिक नाते आहे असे ते म्हणाले. संपादक प्रवीण वाळिंबे यांनी हा विशेषांक आशा भोसले यांच्या जीवन, गाणी, छायाचित्रे आणि विविध लेखांचा समृद्ध दस्तावेज असल्याचे सांगितले. तसेच उषाताई मंगेशकर यांच्या कारकिर्दीला सलाम म्हणून उपस्थितांनी सभागृहात उभे राहून टाळ्यांच्या कडकडाट मध्ये त्यांना यावेळी अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी शिवस्तवन सादर केले. त्यानंतर मनीषा निश्चल आणि धनंजय पवार यांनी हिंदी व मराठी गीतांचा ‘स्वरस्वामीनी’ हा विशेष संगीत कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे, तर सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले.


