spot_img
spot_img
spot_img

आयटी नोकरीचे आमिष दाखवून ७.६० लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

हिंजवडीतील एका कन्सल्टन्सी कंपनीच्या संचालिकेने नामांकित आयटी कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश दत्तात्रयराव भनंग (वय २८, रा. भुकूम, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी मुस्कान जुनेजा (वय २२), संचालिका, सिंक्राटेक एक्स कन्सल्टन्सी, गेरा इम्पेरिया फेज-२, हिंजवडी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तसेच त्यांच्या मित्रांना आरोपीने दोन महिन्यांच्या आत चांगल्या आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून सुमारे ५० हजार रुपये कमिशन लागेल, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून २ लाख १० हजार रुपये तसेच त्यांच्या इतर चार मित्रांकडून एकूण ५ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ७ लाख ६० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली.

मात्र, ठरलेल्या कालावधीनंतरही कोणालाही नोकरी मिळाली नाही. तसेच दिलेली रक्कम परत करण्यासही आरोपीने टाळाटाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!