spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय वैद्यक शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, सुसूत्रता, पारदर्शकता आणि संशोधन संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि इतर आरोग्यविषयक अभ्यासक्रमांना एक सक्षम शैक्षणिक दिशा देण्याचे काम विद्यापीठाने केले आहे. आजच्या या विशेष दिनी आपण सर्वांनी वैद्यकीय शिक्षणातील उत्कृष्टता, नैतिक मूल्यांचे पालन, संशोधनवृत्तीचा विकास आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी आरोग्य शिक्षण, वैद्यकीय संशोधन आणि सेवाभावी आरोग्यसेवेची परंपरा अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला.

या समारंभास अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण सोनी, डॉ. दिपाली अंबिके, डॉ. महेश असलकर, डॉ. तुषार पाटील, डॉ. शगुन पिसे, डॉ. दिनेश गाडेकर, डॉ. नचिकेत पळसकर, डॉ. रुपाली गौरी, डॉ. किशोर सुर्यवंशी, डॉ. रितेश पाठक, डॉ. निरंजन पाठक, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. सीमा सोनी, डॉ. स्वाती मुडशिंकर, डॉ. सुर्यकांत मुनलोड, डॉ. कविता केळकर, डॉ. हर्षद गुजर, डॉ. नितीन मोकाशी तसेच पदव्युत्तर संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, आरोग्य क्षेत्रासाठी कुशल, प्रशिक्षित आणि सेवाभावी मनुष्यबळ घडविण्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. वैद्यकीय शिक्षण हे केवळ पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणापुरते मर्यादित नसून त्यामध्ये मानवी मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि रुग्णांविषयीची संवेदनशीलता यांचाही समावेश असणे आवश्यक आहे. आरोग्यसेवा ही समाजाप्रती असलेली एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी केला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि पदव्युत्तर संस्था ही शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा या त्रिसूत्रीवर कार्यरत आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनाला प्रोत्साहन आणि रुग्णकेंद्री सेवा या माध्यमातून संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रुग्णांना कमी खर्चात, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या या विशेष दिनी समाजाच्या आरोग्य उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत राहणे आणि आरोग्य क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करणे हीच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला खरी मानवंदना ठरेल, असेही डॉ. वाबळे यावेळी म्हणाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!