शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मालमत्ता करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता अवघे २० दिवस शिल्लक राहिले आहेत. ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तो तात्काळ भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
महापालिकेकडून ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. विशेषतः ऑनलाइन माध्यमातून कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करावर १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असल्याने डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२६ ते १० जून २०२६ या कालावधीत २ लाख ९४ हजार ९७१ मालमत्ताधारकांनी कर भरला असून, त्यापैकी ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या २ लाख ६४ हजार २४१ एवढी आहे. ऑनलाइन माध्यमातून आतापर्यंत ३१५ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक कर संकलित झाला आहे.
शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या मालमत्ता तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सर्व मालमत्ताधारकांना वेळेत कर देयके मिळावीत यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता कर बिल वाटप मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. तरीही अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी कर भरला नाही, त्यांनी तो तात्काळ भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आर्थिक स्रोत असून, नागरिकांनी वेळेत कर भरल्यास शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होते. मालमत्ता करावरील सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे २० दिवस शिल्लक असून, नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ऑनलाइन माध्यमातून कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. ३० जून २०२६ पूर्वी कर भरणाऱ्यांसाठी सवलती उपलब्ध असून, नागरिकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीने मालमत्ता कर भरावा. सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे २० दिवस शिल्लक आहेत.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


