spot_img
spot_img
spot_img
spot_img

एमआयडीसीतील कंपन्यांचा कचऱ्याचा भीषण प्रश्न ? कंपन्यांमध्ये कचरा ठेवायचा की उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल? – अभय भोर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी कचरा डेपो येथे पुन्हा एकदा कचऱ्याचा ढिगारा कोसळल्यामुळे कचरा संकलन व्यवस्था ठप्प झाली आहे. मात्र, ही समस्या केवळ दोन दिवसांची नसून गेल्या महिनाभरापासून औद्योगिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. वेळेवर कचरा उचलला जात नसल्यामुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचा धोका वाढला आहे.

इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, कंपन्यांमध्ये साचलेल्या कचऱ्याचा कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम जाणवत आहे. डास, माशा, दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.
सध्या अनेक कंपन्यांमध्ये शासकीय, ग्राहक तसेच गुणवत्ता व्यवस्थापनासंबंधी ऑडिट सुरू आहेत. कंपन्यांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग दिसल्यास ऑडिटमध्ये गंभीर आक्षेप नोंदवले जाऊ शकतात. त्याचा परिणाम कंपन्यांच्या व्यवसायावर, ग्राहकांच्या विश्वासावर आणि भविष्यातील ऑर्डरवर होण्याची शक्यता आहे.

“कंपन्यांमध्ये कचरा ठेवायचा की उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल?” असा गंभीर प्रश्न आता उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. कचऱ्याने उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल आणि मालसाठा ठेवण्याची जागाच व्यापली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका उद्योजक, कामगार आणि उत्पादन व्यवस्थेला सहन करावा लागत आहे.

औद्योगिक कंपन्यांकडून नियमितपणे कर आणि विविध शुल्क वसूल केले जातात. मात्र, कचरा संकलनासारखी मूलभूत सेवा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल, तर हा उद्योग क्षेत्रावर अन्याय आहे. मोशी कचरा डेपोमध्ये वारंवार अडचणी निर्माण होत असताना सक्षम पर्यायी व्यवस्था उभी न करणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि नियोजनशून्य व्यवस्थापनाचे स्पष्ट उदाहरण आहे.
प्रशासनाने तात्काळ पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करून औद्योगिक कंपन्यांमध्ये महिनाभरापासून साचलेला कचरा युद्धपातळीवर उचलावा. अन्यथा उद्योजकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभय भोर यांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!