spot_img
spot_img
spot_img

दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांग भवनाचे उपक्रम उपयुक्त – सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिव्यांग नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. दिव्यांग भवनामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना नवे बळ मिळत आहे. भविष्यातही अशा लोकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य देत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी केले.

दिव्यांग नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाला त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रशांत शितोळे यांनी दिव्यांग भवनाच्या उद्घाटनप्रसंगाच्या आठवणींना उजाळा दिला. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन सोहळ्याचा उल्लेख करताना त्यांनी दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. दिव्यांगांच्या परिपूर्ण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील एकमेव महापालिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिव्यांग बांधवांसाठी सन २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेला ‘पर्पल महा जल्लोष’ हा महापालिकेचा अत्यंत स्तुत्य आणि अभिनव उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. दिव्यांग नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारा हा उपक्रम असून, आगामी काळात तो अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबविण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह दिव्यांग भवन फाऊंडेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यांग भवन येथील विविध सुविधा, सेवा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा यावेळी घेतला. भवनातील रुग्ण, लाभार्थी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. ई-लायब्ररी, ऑडिओमेट्री रूम, एक्स्पिरियन्स सेंटर, स्पीच थेरपी विभाग, ग्रंथालय, संगणक कक्ष, संगीत विभाग तसेच दिव्यांगांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख उपक्रमांची देखील त्यांनी पाहणी केली.

यावेळी ते म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुमारे २४ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात आलेली दिव्यांग भवनची चार मजली अत्याधुनिक इमारतीत दिव्यांग बांधवांसाठी विविध सेवा आणि सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग नागरिकांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, सुविधा याचा अधिकाधिक लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यक उपाययोजना कराव्यात. भवनात उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा आणि सेवांमुळे दिव्यांगांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे, असे देखील त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. दिव्यांग नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. परेश गांधी यांनी दिव्यांग भवनबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!