पार्थ पवारांच्या मध्यस्थीनंतर टिंगरेंचा निर्णय; ‘पक्ष न्याय देईल’ म्हणत उमेदवारी अर्ज मागे
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून माजी आमदार तथा शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. जिजाई बंगल्यावर पार्थ पवार, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांनी सुनील टिंगरे यांना पक्षाकडून योग्य न्याय दिला जाईल आणि त्यांचा सन्मान कायम राखला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर टिंगरे यांनी माध्यमांसमोर येत निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बांधकाम व्यावसायिक विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी ‘आयात उमेदवार’ म्हणून काकडे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. त्यानंतर पक्षाने सुनील टिंगरे यांनाही अर्ज दाखल करण्यास सांगितले होते.
विशेष म्हणजे, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनाही पक्षाकडून ‘एबी फॉर्म’ देण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नेमका कोण, याबाबत राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या घडामोडींमुळे पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड झाल्याची चर्चा रंगली होती.
दरम्यान, काल झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांनी मध्यस्थी करत टिंगरेंची समजूत काढली. त्यानंतर टिंगरे यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
“पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो सर्वांनी मान्य केला आहे. पक्ष मला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. राजकारणात काही वेळा पक्षहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. संजय काकडे यांनी पक्षप्रवेश केला आहे, त्यामुळे त्यांना पक्ष कार्यालयात येण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे आणि दिलेला शब्द पाळतो. पुढील काळात माझा योग्य सन्मान राखला जाईल, असे मला सांगण्यात आले आहे,” असे सुनील टिंगरे यांनी सांगितले.
टिंगरे यांच्या माघारीमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला असून पुणे विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादीतील उमेदवारीचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे.


