spot_img
spot_img
spot_img

सोन्यात गुंतवणुकीचा नवा पर्याय! एनएसईची ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स’ योजना सुरू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, सोन्याच्या वाढत्या किमती आणि केंद्र सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्कात केलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) गुंतवणूकदारांसाठी सोन्यात गुंतवणुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एनएसईने ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स’ (EGR) या योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून, 18 मेपासून या विभागातील प्रत्यक्ष व्यवहारांना सुरुवात झाली आहे.

या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना सेबी-नोंदणीकृत व्हॉल्ट्समध्ये साठवलेल्या सोन्याची इलेक्ट्रॉनिक स्वरूपात खरेदी आणि विक्री करता येणार आहे. ईजीआरचे व्यवहार समभागांप्रमाणेच शेअर बाजारात होतील. खरेदी केलेल्या रिसीट्स डिमॅट खात्यात ठेवता येतील तसेच गरज पडल्यास त्यांचे भौतिक सोन्यात रूपांतरही करता येणार आहे.

विशेष म्हणजे, या योजनेत केवळ 100 मिलिग्रॅम सोन्यापासून गुंतवणूक सुरू करता येणार असल्याने लहान गुंतवणूकदारांनाही सोन्यात गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी, सुरक्षित साठवणूक आणि शुद्धतेच्या चिंतेशिवाय गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

एनएसईने 16 मे रोजी या प्रणालीची व्यापक चाचणी घेतली होती. या चाचणीत कोणतीही तांत्रिक अडचण किंवा प्रणालीतील त्रुटी आढळली नसल्याने 18 मेपासून व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यात आले. बाजारातील सहभागी, मध्यस्थ संस्था आणि गुंतवणूकदारांकडून या नव्या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे एनएसईकडून सांगण्यात आले.

सोन्यातील गुंतवणुकीला अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ बनवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः वाढत्या सोन्याच्या किमतींच्या काळात ही योजना गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!