spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी महापौर रवि लांडगे आक्रमक; कार्यवाहीचे आश्वासन

भोसरी उड्डाणपूल पाडू नका, गावठाणात अतिरिक्त भूसंपादन नको; महामार्गावरील सर्व विकासकामे नागरिकहित जपूनच करा – महापौर रवि लांडगे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न, वाढती वाहतूक कोंडी, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या तसेच शहरातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासमवेत सविस्तर बैठक घेतली.

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध प्रश्नांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

बैठकीत पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्ग (Elevated Corridor) प्रकल्पाची सद्यस्थिती, मुंबई-बंगळुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांचे रुंदीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, अपघातप्रवण ठिकाणांवरील उपाययोजना, जलनिस्सारण व्यवस्था, पावसाळ्यात महामार्गावर आणि अंडरपासमध्ये साचणारे पाणी, अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

याशिवाय मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग परिसरात प्रस्तावित उड्डाणपूल, अंडरपास दुरुस्ती, सेवा रस्ते बांधणी व रुंदीकरण, वाहतूक सुरळीत करण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहितीही NHAI अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. वाकड, पुनावळे, ताथवडे, रावेत, किवळे तसेच इतर भागांतील वाहतूक आणि पाणी साचण्याच्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून संबंधित कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

बैठकीत भोसरी परिसराशी संबंधित दोन अत्यंत महत्त्वाचे विषय महापौर रवि लांडगे यांनी ठामपणे मांडले. भोसरी येथील विद्यमान उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत पाडण्यात येऊ नये तसेच भोसरी गावठाण परिसरात अतिरिक्त भूसंपादन करण्यात येऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. विकासकामांच्या नावाखाली स्थानिक नागरिकांना कोणताही अन्याय सहन करावा लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापौरांनी भोसरी गावठाणातील नागरिकांच्या भावना, स्थानिक व्यापारी, रहिवासी आणि वाहतूक व्यवस्थेवर होणारे परिणाम यांचा सविस्तर उल्लेख करत विकास आणि नागरिकहित यामध्ये समतोल राखणे आवश्यक असल्याचे सांगितले.

महापौरांच्या सूचनांची दखल घेत NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या कामांना प्राधान्य देण्यात येईल तसेच महापौरांनी मांडलेल्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताशी संबंधित कोणत्याही विषयात तडजोड केली जाणार नाही. राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित प्रश्नांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करणे, वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि विकासकामे वेळेत पूर्ण करणे हे आमचे प्राधान्य आहे. भोसरी उड्डाणपूल आणि गावठाण भूसंपादनाच्या विषयावर नागरिकांच्या भावना सर्वोच्च मानूनच पुढील भूमिका घेतली जाईल. शहराच्या विकासासोबतच नागरिकांचे हक्क आणि हित जपणे ही आमची जबाबदारी आहे.”

पिंपरी-चिंचवड शहरातील महामार्ग विकासकामे, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लागावेत यासाठी महानगरपालिका आणि NHAI यांच्यात सातत्याने समन्वय ठेवण्यात येणार असून, प्रलंबित कामांना गती देण्यासाठी नियमित आढावा बैठका घेण्यात येणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!