शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवार (दि. 28 मे) रोजी एकाच दिवशी आठ नागरिकांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील अवैध मद्यविक्री व बार व्यवसायाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील कृष्णानगर परिसरात सुरू असलेल्या अवैध बार व वाईन शॉपमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे की, कृष्णानगर, अजंठानगर घरकुल, भीमशक्तीनगर, महात्मा फुले नगर आणि हरगुडे वस्ती परिसरात काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अवैध व्यवसाय सुरू असतात. त्यामुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सामाजिक वातावरणही बिघडत आहे.
तसेच काही ठिकाणी संशयास्पद हालचाली वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. संबंधित अवैध व्यवसायांवर तातडीने छापेमार कारवाई करून ते बंद करण्यात यावेत तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जाधव यांनी विशेषतः कृष्णानगर चौकातील भिशे वाईन शॉपचा मुद्दा उपस्थित केला आहे. या ठिकाणी मद्यधुंद व्यक्तींकडून महिलांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून असल्याचे त्यांनी सांगितले. शिवीगाळ, मारामाऱ्या आणि गोंधळाच्या घटना वारंवार घडत असून यापूर्वी गंभीर गुन्हे आणि खुनासारख्या घटनाही या परिसरात घडल्याचा दावा त्यांनी केला.
कृष्णानगर चौकातील भिशे वाईन शॉपवर तात्काळ कारवाई करून ते अन्यत्र हलविण्यात यावे, अशी मागणी करत अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मारुती जाधव यांनी दिला आहे.


