शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी येथे विषारी दारू सेवनामुळे १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक व वेदनादायी असल्याची भावना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली आहे. या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
या प्रकरणातील मुख्य संशयित योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली असली, तरी नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींना तातडीने न्यायालयासमोर उभे करण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले.
दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांच्या घरी जाऊन भाऊसाहेब भोईर यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेत सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, “या कठीण प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरातील अवैध दारू व्यवसाय, अमली पदार्थांची तस्करी व इतर बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने कठोर मोहीम हाती घ्यावी.”यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराला सुरक्षित, व्यसनमुक्त आणि कायद्याचे राज्य असलेले शहर बनविण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित केली.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भाऊसाहेब भोईर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.



