spot_img
spot_img
spot_img

हलगर्जीपणामुळेच १5 जणांचा बळी; ‘आप’चा खळबळजनक आरोप

शबनम न्यूज | प्रतिनिधी
“पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीबाबत आणि त्यास खतपाणी घालणाऱ्या जबाबदार यंत्रणेवर कठोर कारवाई करण्याबाबत ‘आम आदमी पार्टी’च्या वतीने पोलीस आयुक्तांना लेखी पत्र देऊन आधीच चेतावणी देण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने या गंभीर इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष केले. जर वेळीच पोलीस आयुक्तांनी यावर कठोर पावले उचलली असती, तर आज 15 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला नसता. या दुर्दैवी मृत्यूंना पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि निष्क्रियताच जबाबदार आहे,” असा घणाघाती आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
​शहरातील विविध भागात हातभट्टी आणि अवैध दारूचे धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे ‘आप’च्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्या पत्रात स्पष्ट नमूद केले होते की, या अवैध धंद्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. परंतु, या इशाऱ्याला केराची टोपली दाखवण्यात आली. प्रशासन आणि पोलिसांच्या याच हलगर्जीपणामुळे अखेर 15 जणांचा बळी गेला, ज्याचे संपूर्ण पाप प्रशासनाच्या माथी आहे.
​’आप’च्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
१. अवैध दारू विक्रीस अभय देणाऱ्या संबंधित भागातील पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
२. शहरातील सर्व अवैध हातभट्टी दारूचे अड्डे कायमचे उद्ध्वस्त करण्यात यावेत.
३. मृतकांच्या कुटुंबांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी.
​जर या घटनेनंतरही पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही आणि दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर आम आदमी पार्टी संपूर्ण शहरात प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!