spot_img
spot_img
spot_img

पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर; निखिल दळवींचे महापालिकेला निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मधील नाले, स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि ओपन गटारांची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे.

यासंदर्भात निखिल दळवी यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक १४ मधील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि ओपन गटार तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नाले आणि गटारांची स्वच्छता केली जाते. मात्र, यंदा अद्यापही अनेक ठिकाणी स्वच्छतेची कामे पूर्ण झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने सर्व नाले, स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि ओपन गटारांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी निखिल दळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!