spot_img
spot_img
spot_img

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून ऊर्जा बचत व खर्च नियंत्रणासाठी उपाययोजना लागू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ऊर्जा बचत, इंधन वापर नियंत्रण, खर्च नियंत्रण तसेच कार्यपद्धतीमध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात जारी केलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागांसाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभ्यास, प्रशिक्षण अथवा शासकीय कामकाजासाठी मंजूर असलेले परदेश दौरे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येणार असून नवीन परदेश दौऱ्यांचे नियोजन टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाह्यस्त्रोताव्दारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये शक्य त्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी नियोजित स्थळभेटी, पाहण्या व तपासणी दौरे यामध्ये कमीत कमी वाहनांचा वापर करून योग्य नियोजन करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संयुक्त दौरे नियोजित करताना कारपूलिंग पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. दौरे अपरिहार्य असल्यास मेट्रो, रेल्वे, पीएमपीएमएल बस अथवा इतर सार्वजनिक वाहतूक सुविधांचा प्राधान्याने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून सकारात्मक पुढाकार घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेच्या अखत्यारीतील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रांबाबत प्राप्त प्रस्ताव, परवानग्या व संबंधित प्रशासकीय कार्यवाही प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार्जिंग सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच महानगरपालिका स्तरावरील बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे, आढावा बैठका व सेमिनार शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अथवा ऑनलाइन प्रणालीद्वारे आयोजित करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अंतर्गत बैठका, प्रशिक्षण व समन्वय सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास प्राधान्य देऊन प्रवास व इतर अनुषंगिक खर्चात बचत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माहिती, प्रसिद्धी व जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या जाहिराती, बॅनर्स, फ्लेक्स, सजावटीचे विद्युत दिवे व तत्सम खर्चिक बाबींचा वापर आवश्यकतेपुरताच मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनावश्यक खर्च टाळून काटकसरीचे धोरण राबविण्यावर भर देण्यात आला आहे. सर्व कार्यालयांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा तसेच कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, वातानुकूलन यंत्रणा, संगणक, उद्वाहन व इतर विद्युत उपकरणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वातानुकूलन यंत्रणेचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कॅन्टीन, रुग्णालये, वसतिगृहे, बालवाडी, अंगणवाडी केंद्रे तसेच इतर भोजन व्यवस्थांमध्ये खाद्यतेलाचा नियंत्रित व संतुलित वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. आयाताधारित तेलावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने पाम, सोयाबीन व सूर्यफूल तेलाच्या तुलनेत स्थानिक स्तरावर उपलब्ध मोहरी व शेंगदाणा तेलाच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांनी पोषणमूल्यांचा विचार करून आवश्यकतेनुसार आहार नियोजनामध्ये सुधारणा कराव्यात, असेही नमूद करण्यात आले आहे.

महानगरपालिका क्षेत्रामध्ये पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पीएनजी जोडणी, वितरण व्यवस्था व संबंधित पायाभूत सुविधांबाबत प्राप्त प्रस्तावांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे व प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत अत्यावश्यक बाबी वगळता नवीन सल्लागार नियुक्ती प्रस्ताव सादर करणे टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांची माहिती सर्व अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची जबाबदारी सर्व विभाग प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!