युनूस खतीब | प्रतिनिधी
चिखली परिसरातील एका ज्वेलर्स दुकानात चांदीच्या पैजण चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० मे २०२६ रोजी सकाळी १०:३० ते १०:४५ वाजण्याच्या सुमारास बालाजी ज्वेलर्स, शिवाजी चौक, लोखंडे कॉम्प्लेक्स, देहु-आळंदी रोड, चिखली येथे ही घटना घडली.
फिर्यादी सुनिल जवाहरलाल पवार (वय ३२, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी निलाबाई बाबु शिंदे (वय ५५), फुलाबाई भानुदास ढोकळे (वय ६०) आणि इंदाबाई दिलीप ढोकळे (वय ६०, सर्व रा. नागेवाडी, ता. व जि. जालना) यांनी दुकानातील अंदाजे ५० हजार रुपये किमतीची १८० ग्रॅम वजनाची चांदीची तीन पैजणे अप्रामाणिकपणे चोरी करण्याचा प्रयत्न केला.
ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही महिला आरोपींना अटक केली.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. ३१७/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०५(अ), ६२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहवा टिळेकर करीत आहेत.


