‘काटकसरी’च्या मुद्द्यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न; पदाधिकाऱ्यांच्या खर्चावर सवाल
प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत आणि काटकसरीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी थेट बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश करत पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या खर्चिक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती माई काटे, प्रतीक्षा जवळकर आणि नगरसेवक राजू बनसोडे हे पारंपरिक बैलगाडीतून महापालिका भवनात दाखल झाले. या वेळी घोषणाबाजी, पारंपरिक वेशभूषा आणि बैलगाडीमुळे महापालिका परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. नागरिक, कर्मचारी तसेच सभागृहात येणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही हे आंदोलन पाहण्यासाठी गर्दी केली.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजप सरकार आणि महापालिका प्रशासनावर थेट निशाणा साधत, “देशात आर्थिक शिस्त आणि काटकसरीचा संदेश दिला जात असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र पदाधिकाऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे,” असा आरोप केला. सुरक्षाव्यवस्था, दौरे, वाहनांचा वापर आणि विविध सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
नगरसेवकांनी पुढे सांगितले की, सामान्य नागरिकांना पाणी, रस्ते, वाहतूक आणि आरोग्य सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना सत्ताधारी मात्र प्रसिद्धी आणि दिखाऊ विकासावर भर देत आहेत. “महापालिकेतील आर्थिक प्राधान्यक्रम चुकीचे असून जनतेच्या पैशांचा विनाकारण वापर सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
या आंदोलनामागे इंधन बचतीचा संदेश आणि ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक म्हणून बैलगाडीचा वापर करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्पष्ट केले. “हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेविरोधातील निषेध आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या या आंदोलनामुळे महापालिकेतील खर्च, पदाधिकाऱ्यांच्या सुविधा आणि आर्थिक धोरणांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


