spot_img
spot_img
spot_img

पाटस रेल्वे स्थानकावर जीवघेणा थरार! पूल नसल्याने महिलेचा मृत्यूशी सामना

मालगाडी समोर येताच ट्रॅकवर झोपून वाचवला जीव

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पुणे विभागातील पाटस रेल्वे स्थानकावर अपुऱ्या पादचारी सुविधांमुळे प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा समोर आला आहे. स्थानकावर रेल्वे रुळ ओलांडताना एका महिलेसमोर थेट मृत्यू उभा ठाकला होता. अचानक समोर आलेल्या मालगाडीपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी महिलेने प्रसंगावधान राखत थेट रेल्वे ट्रॅकवर झोपून जीव वाचवल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटस रेल्वे स्थानकावर काही भागात अद्यापही पादचारी पुलाची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत. आज सकाळच्या सुमारास एक महिला रुळ ओलांडत असताना अचानक मालगाडीला सिग्नल मिळाला आणि गाडी वेगाने पुढे सरकू लागली.

गाडी अत्यंत जवळ आल्याचे लक्षात येताच महिलेने धाडस दाखवत ट्रॅकवर झोपण्याचा निर्णय घेतला. काही क्षणांसाठी उपस्थित प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता. मालगाडी महिलेच्या अंगावरून पुढे गेल्यानंतर ती सुरक्षित बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून २ वर जाण्यासाठी कोणताही पादचारी पूल नव्हता. त्यामुळे नागरिकांना मालगाड्यांच्या मधून किंवा खाली वाकून जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत होता. अनेक वर्षांच्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म १ ते २ दरम्यान पादचारी पूल उभारला.

मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पुढे असलेल्या दोन अतिरिक्त रेल्वे रुळांवरून जाण्यासाठी अद्याप कोणतीही सुरक्षित व्यवस्था करण्यात आलेली नाही. या मार्गावरून सतत मालगाड्यांची ये-जा सुरू असते. परिणामी नागरिकांना आजही थेट रुळ ओलांडून प्रवास करावा लागत आहे.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून पाटस रेल्वे स्थानकावर तातडीने सुरक्षित पादचारी पुलाची उभारणी करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!